संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. गडकोट हेच राज्य. गडकोट म्हणजे राज्याचे मूळ. गडकोट म्हणजे खजिना. गडकोट म्हणजे सैन्याचे मूळ. गडकोट म्हणजे राज्य लक्ष्मी. गडकोट म्हणजे आपले प्राणसंरक्षण असे रामचंद्रपंत अमात्य यांनी आपल्या आज्ञापत्रात लिहिले होते. हे सारेच्या सारे वर्णन छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वच किल्ल्यांसाठी आहे. तथापि महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या किल्ले रायगडला तर ते तंतोतंत लागू पडते. रायगड-अलिबाग जिल्ह्यात असलेल्या या किल्ल्याला दरवर्षी लाखो पर्यटक, शिवप्रेमी भेट देऊन छत्रपती शिवरायांच्या समाधीस्थळी नतमस्तक होतात आणि नवप्रेरणा घेऊन मोठ्या उत्साहात छत्रपतींचे गुणगाण गातात. अगदी दोन दिवसाची सुट्टी लक्षात घेऊन आपण गडकिल्ले रायगडवर जाऊन याची देही याची डोळा महाराष्ट्राची अस्मिता हृदयात साठवू शकतो. त्यासाठीची ही थोडक्यातमाहिती... महाराष्ट्राची अस्मिता असलेला रायगड किल्ला हा कोकणाच्या ऐतिहासिक वैभवाची महत्वपूर्ण साक्ष म्हणून मोठ्या गौरवाने अलिबाग-रायगड जिल्ह्यात लाखो पर्यटकांना शिववैभवाची व शिवपराक्रमाची कहाणी सांगत उभा आहे. ६ जून १६७४ रोजी याच किल्ल्यावर शिवछत्रपतींचा राज्याभिषेक होऊन ते छत्रपती झाले. हिंदवी स्वराज्याची ही एक महत्वपूर्ण घटना अस्मिता किल्ले असून महाराजांची राजधानी म्हणून रायगड किल्ल्याला अनन्यसाधारण महत्व आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही किल्ल्यावर येऊन छत्रपती शिवरायांचे आशीर्वाद घेतले.
महाराष्ट्राची अस्मिता किल्ले रायगड