परिवहनच्या ५१० कर्मचाऱ्यांना मिळणार थकीत महागाई भत्ता

 


ठाणे - परिवहनच्या सेवेत १९९४ पासून काम करीत असलेल्या हंगामी कर्मचाऱ्यांचा सुमारे दीड कोटी रुपयांचा महागाई भत्ता प्रशासनाच्या बेफिकीरपणामुळे थकला आहे. महापालिकेच्या लेखा विभागाकडे हा महागाई भत्ता मिळण्याबाबत प्रयत्न न केल्याने कर्मचाऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी महागाई भत्त्याची थकबाकी देण्याचे आदेश परिवहनचे सभापती दशरथ यादव यांनी प्रशासनाला दिले. परिवहनच्या बैठकीत कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबत शिवसेनेसह सर्व सदस्यांनी प्रशासनावर टीकेची झोड उठवली. ज्या वाहक व चालकांच्या जोरावर परिवहनचा गाडा सह आहे त्यांच्या गरजांकडे लक्ष देण्याची नितांत गरज असल्याचे सांगण्यात आले. गेली अनेक वर्षे ५१० कर्मचारी काम करीत असून त्यांच्याबाबत सहानुभूती का दाखविली जात नाही, असा खडा सवाल शिवसेनेचे सदस्य अनिल भोर यांनी केली.